‘आनंददायी पालकत्व’ लेखमाला भाग- 4पालकत्वाचे प्रकार :-
3 ) सकारात्मक पालकत्व :-
आता आपण म्हणाल की मुलांना अधिकार दर्शक पालकांसारखे कडक शिस्तीत ठेवायचे नाही . किंवा शरणागत पालकांसारखे मुलांचे अति लाड करायचे नाहीत. तर मग कशा स्वरूपाचे पालकत्व असावे . तर याचे उत्तर आहे ‘सकारात्मक पालकत्व’ . ‘सकारात्मक पालकत्वाला अधिकार दर्शक पालकत्व व शरणागत पालकत्वाचा सुवर्णमध्य म्हणता येईल.
या प्रकारचे पालक हे मुलांना ,ना अति धाकात ठेवतात ना त्यांचे अति लाड करतात. सकारात्मक पालकत्वामध्ये पुढील तीन गोष्टी महत्वाच्या असतात.
1) एकाच वेळी सह्रद्य व ठाम वागणे .
2) निर्णय प्रक्रियेत मुलांचा सहभाग .
3) मोठी माणसे व मुले यांच्यातील परस्पर आदर व सहकार्य .
1) एकाच वेळी सह्रद्य व ठाम वागणे :-
सकारात्मक पालकत्वासाठी ही पहिली महत्वाची अट आहे. मुलांचा आदर राखला जाऊन त्यांच्या प्रगतीला वाव मिळवून देण्याच्या दृष्टिने सह्रद्य असणे व त्याचबरोबर पालक म्हणून स्वत:चा व परिस्थितीनुरूप गरजांचा आदर राखला जावा यासाठी ठामपणा देखील आवश्यक आहे. कडक शिस्तीच्या मार्गावर सह्रद्य लोप पावते तर लाडाच्या मार्गावर ठामपणा गायब होतो. सहृदयतेनं वागणं म्हणजे मुलांचा आणि स्वत:चाही आदर राखणं. मुलांचे लाड करणं म्हणजे त्यांचा आदर राखणं नव्हे. मुलांशी आदरानं वागणं म्हणजे त्यांच्या भावना समजून घेणं. याचा अर्थ त्यांचं वाटेल ते वर्तन मान्य करणं असा नाही. त्याचप्रमाणे ठामपणा जेव्हा सहृदयतेच्या बरोबरीनं येतो तेव्हा त्याचा अर्थ असतो, सर्वांबद्दल सन्मानाची भावना, ममत्त्व आणि जिव्हाळा. सगळ्यांनी एकत्र आनंदानं रहायचं तर काही एक नियम असायलाच हवेत.
2) निर्णय प्रक्रियेत मुलांचा सहभाग :-
जेंव्हा सह्रद्याबरोबर ठामपणा येतो वागणे तेंव्हा त्याचा अर्थ असा होतो की सर्वांबद्दल सन्मानाची भावना , ममत्व , आणि जिव्हाळा .
सर्वांनी आनंदाने राहायचे तर काही नियम असणे गरजेचे आहे. उदा. मुलांनी किती वेळ टी.व्ही. पहावा या गोष्टीचा निर्णय घेत असताना केवळ पालकांनी स्वत:ला वाटणारे नियम केले व मुलांना जर त्यामध्ये विश्वासात घेतले नाही तर असे वेळापत्रक हे एक दोन दिवसांच्या पुढे चालणार नाही. परंतु त्या ऐवजी ही समस्या सोडवताना जे नियम तयार करणार त्यामध्ये मुलांचे विचार घेतले तर ते नियम मुले पाळतील .
कुटुंबातील , शाळेतील निर्णय प्रक्रियेत , कामकाजामध्ये जर मुलांचा सहभाग घेतला तर मुलं स्वयंशिस्तीच्या दिशेने निश्चित बळावतील.
3) मोठी माणसे व मुले यांच्यातील परस्पर आदर व सहकार्य :-
गेल्या दोन शतकामधील झालेल्या वैचारीक प्रभोधनातून समाजमनात स्वातंत्र्य ,समता , बंधुता ,न्याय या मूल्यांची रूजवण झाली आहे त्यामुळे स्वत:चा आदर व सन्मान इतरांकडून राखला जावा ही इच्छा प्रत्येकाच्या मनात जागी होत आहे. मुलं हे सारे जवळून बघत आहे, अनुभवत आहेत.त्यामुळे वयानी मोठी होत जाणारी मुलं पालक शिक्षक जे म्हणतील ते सगळेच मानतील असे नही. मुलांची ही मानसिकता मोठ्या माणसांनी समजून घ्यायला हवी , त्यांच्या बरोबरचे वागणे बदलावे लागेल .परंतु हे करत असताना समजा मुलांची विरोध दर्शवणारी पध्दत ही राग आणणारी असेल तर तसे त्यांना स्पष्ट्पणे सांगावं पण मुलांना नेमक काय म्हणायचे ते सह्रद्य समजून घ्यायला हवे.
म्हणजे मोठी माणसं ज्या प्रमाणे लहान मुलांकडून आपला आदर राखला जावा याची अपेक्षा करतात त्याच प्रमाणे त्यांनी देखील लहान मुलांचा आदर राखायला हवा. या ठिकाणी आदर याचा असा अर्थ आहे की घरातील आवश्यक अशा छोट्या-छोट्या निर्णयांमध्ये त्यांचे मत , विचार जाणून घेण्याचा प्रयत्न करायला हवा. अशाप्रकारे मोठी माणसे व मुले यांच्यातील परस्पर आदर व सहकार्य हे आनंदायी पालकत्वासाठी महत्वाचे आहे.

No comments:
Post a Comment