Wednesday, 30 September 2020

मुलांचे ऐकावयास तत्पर असणे

आनंददायी पालकत्वाची 21 तत्वे 

 तत्व क्र. 3 

  मुलांचे ऐकावयास तत्पर असणे 


 

      पालकत्व आनंददायी बनवण्यासाठी उपयुकत असणा-या  21 तत्वापैकी दुसरे तत्व मागील भागात आपण पाहिले ते म्हणजे मुलांशी संवाद साधण्यासाठी खास वेळ काढणे...! मात्र या खास वेळेत पालाकांनी केवळ आपलेच विचार मुलांसमोर मांडायचे नाहीत तर मुलांचे विचार देखील समजून घ्यायचे आहेत त्यामुळे पालकत्व आनंददायी बनवण्यासाठी उपयुकत असणा-या  21 तत्वापैकी तिसरे तत्व आज आपण पाहणार आहोत ते म्हणजे मुलांचे ऐकावयास तत्पर असणे ...!

 

     ज्या प्रमाणे मोठ्या माणसांचे स्वत:चे काही विचार ,मते असतात त्याच प्रमाणे आपल्या मुलांचे देखील एखाद्या घटनेसंदर्भातचे , प्रसंगासंदर्भातचे वैयक्तिक काही विचार अथवा मते असतात. मुलांचे हे विचार , मते त्यांच्या वयानुसार असतात. अनेकवेळा मुले आपले विचार पालकांच्या अमोर मांडत असताना घरातील मोठी मंडळी त्यांच्या विचारांना , मतांना निरर्थक समजून त्याच्याकडे दुर्लक्ष करतात किंवा त्यांच्यावरती ओरडून मत , विचार मांडण्यापासून मध्येच रोखले जाते. मुलांच्या विचारांच्या बाबतीत अशा प्रकारची पालकांची वर्तवणुक जर पुन्हा पुन्हा होत असेल. तर मुले हळू-हळू आपली मते कुटुंबातील व्यक्तींच्या समोर मांडणे सोडून देतात. कारण त्यांच्या मनात अशी भावना निर्माण होते की आपल्या विचारांना कोणत्याच प्रकारचे महत्व नाही, आपले विचार चूकीचे आहेत. तसेच काही मुलांच्या मनात अशी भावना निर्माण होऊ शकते की घरात आपल्याला,  आपल्या विचारांना किंमत नाही. व हा निर्माण झालेला न्यूनगंड मुलांच्या पुढील वाढीच्या टप्प्यात घातक ठरतो. त्यामुळे मुले आपले विचार मांडत असतील तर आई-वडीलांनी सर्वप्रथम त्यांचे म्हणणे ऐकून घ्यावे व नंतर मुलांच्या त्या विचारवती योग्य अशी सकारात्मक प्रतिक्रिया द्यावी. 

        `“तू गप्प बस.!” , “तुला काही कळत नाही.” ,” मोठ्या माणसात तुझे काय काम आहे? ” अशा नकारात्मक प्रतिक्रियांऐवजी सर्वप्रथम तो / ती काय म्हणते ते ऐकून घ्या नंतर त्याच्या/ तिच्या वयाचा विचार करता त्याचे मत किती योग्य वा अयोग्य आहे ते पहावे. व त्याचे मत योग्य असल्यास त्याला प्रोत्साहन देण्यासाठी “ अरे वा चांगली कल्पना आहे.” , “ आपण या मतावरती विचार करूया.” अशा सकारात्मक प्रतिक्रिया दिल्यास त्याच्या विचारांना चांगलीच प्रेरणा मिळेल व पुढील वेळेस अधिक चांगले विचार , कल्पना तो आपल्या समोर मांडेल. 

   काही वेळा मुलांचे विचार ,मत, कल्पना चूकीच्या असतील तर त्याच्या विचारमध्ये योग्य ते बदल करून नंतर त्यांचा स्विकार करावा जेणेकरून तो निराश न होता योग्य विचार कसे करावेत ते शिकेल उदा. आपण त्याला/ तिला असे म्हणू शकतो की “ तू जे विचार मांडलेस ते थोडेसे योग्य आहे ,मात्र त्याच्यात जर आपण  असा................ बदल केला तर अधिक चांगले होईल.” 

   अशा प्रकारे नेहमी मुले काय म्हणतात , काय बोलतात हे जर आपण ऐकावयास तत्पर असू तर त्यांचे विचार आपल्याला कळतील व त्यांचे विचार जर योग्य असतील तर चांगलीच बाब आहे. मात्र जर तसे नसेल तर आपण मुलांच्या विचारांमध्ये योग्य तो सकारात्मक बदल करण्यासाठी प्रयत्न करू शकतो. त्यामुळेच नेहमी मुले आपल्याशी काय बोलतात ते ऐकावे. आणि म्हणूनच  

    पालकत्व आनंददायी बनवण्यासाठी उपयुकत असणा-या  21 तत्वापैकी तिसरे तत्व आज आपण पाहिले ते म्हणजे मुलांचे ऐकावयास तत्पर असणे ...! धन्यवाद...!     


Thursday, 3 September 2020

जादुई वि४ - भाग 1

 जादुई विचार - भाग 1



“तुमच्या अंगी असलेले योग्य कौशल्य व ते कौशल्य संपादन करण्यासाठी तुम्ही घेतलेले कष्ट हेच तुम्हाला नेहमी तारते”

   शर्टाला बटन लावण्यापासून ते स्पेस मध्ये सोडल्या जाणा-या रॉकेटची निर्मिती अशा प्रत्येक कृतीमध्ये कौशल्य असणे गरजेचे आहे. खूप वेळा एखाद्या कृतीचे ज्ञान असणे म्हणजेच कौशल्य प्राप्त झाले असे समजले जाते. मात्र ज्ञान वेगळे व कौशल्य वेगळे.  ज्ञान म्हणजे एखाद्या विषयाची/गोष्टीची माहिती असणे. व प्राप्त ज्ञानाचा दैनंदिन जीवनात सहजतेने वापर करणे म्हणजे कौशल्य होय. तसेच कौशल्य म्हणजे अशा स्वरूपाची क्षमता जीच्या माध्यमातून आपल्याकडे असलेल्या ज्ञानाचा उपयोग करणे तसेच समस्यांचे निराकरण करणे  ज्ञान व कौशल्य या दोन्ही बाबी एकमेकांवर अवलंबून आहेत. कौशल्याशिवाय ज्ञान निरोपयोगी आहे. 

   वरील फोटोमधील हरणांचेच उदाहरण घेतले तर या शाकाहारी प्राण्याला जंगलातील इतर मांसाहारी प्राण्यांपासून स्वत:चे रक्षण करण्यासाठी काही कौशल्ये असणे आवश्यक आहेत. आणि ती कौशल्ये म्हणजे इतर मांसाहारी प्राण्यांपेक्षा वेगाने धावणे , चपळता , चकवा देणे , सावध असणे. हीच कौशल्ये त्याला जंगलातील जीवन जगण्यासाठी सर्वप्रथम उपयोगी पडतात. आणि म्हणूनच ही कौशल्ये ज्या हरणाकडे जीतकी चांगली तीतके त्याचे जंगलातील जीवन जगण्याचा कालावधी अधिक मात्र ही कौशल्ये एका दिवसात त्याला प्राप्त झालेली नसतात. जन्माला आल्यापासून अशी कौशल्ये मिळवण्यासाठी सराव व प्रयत्न हरणाची पिले करत असतात त्यामुळेच या पिलांचे लक्ष खाण्यापिण्यापेक्षा जास्त उड्या मारणे, धावणे, चकवा देणे यासारख्या खेळामध्ये असते व याच्यातून हळूहळू त्यांच्यामध्ये या कौशल्यांचा विकास होतो. व अशी प्राप्त कौशल्येच त्याला भविष्यात जंगलातील इतर मांसाहारी प्राण्यांपासून सुरक्षीत ठेवण्यास उपयोगी ठरते.  

   याच पद्धतीने आपल्याही जीवनात स्वत:च्या अंगी असलेली विविध कौशल्ये आपले जीवन सुखकर करण्यास मदत करतात. मात्र अशी कौशल्ये संपादन करण्यासाठी सर्वप्रथम आपल्या अंगी असलेल्या क्षमतांचा विचार करावा लागतो. त्याच्यानंतर आपल्या क्षमतेसोबतच कोणत्या गोष्टींची/.कृतींची आवड आहे याचादेखील विचार करणे आवश्यक आहे कारण पुढे त्या कृती करण्याचे कौशल्य संपादन करण्यासाठी आपल्यातील क्षमतेनुसार सराव करत असताना जर त्या गोष्टीची/कृतीची आपल्याला आवड नसेल तर दीर्घ काळापर्यंत त्याचा सराव करण्याचा कंटाळ येऊ शकतो व अशावेळी ते कौशल्य संपादन करण्यासाठी केला जाणारा सराव मध्येच बंद केला जातो. मात्र आपल्या आवडीची कृती करताना कंटाळा येत नाही व अशा कृतीचा सराव केल्याने त्याचे कौशल्या आपल्या अंगी बाणवले जाते म्हणूनच आपल्या आवडीचा देखील विचार करणे गरजेचे आहे. व त्याच्यानंतर सराव आणि हा सराव ते कौशल्य जो पर्यंत चांगाल्या प्रकारे प्राप्त होत नाही तोपर्यंत करणे आवश्यक आहे.  

क्षमता

   

आवड

   

सराव/कष्ट

    

कौशल्य

    कौशल्ये ही वेगवेगळ्या प्रकारची असतात उदा. गायन, वादन, चित्र काढणे, नाचणे, खेळणे, संगणकावर प्रोर्गामिंग करणे, (शर्टाला बटन लावण्यापासून ते स्पेस मध्ये सोडल्या जाणा-या रॉकेटची निर्मिती अशा सर्व कामांमध्ये कौशल्य लागतेच ) 

     दैनंदिन जीवनात विविध कामे आपल्याला करावी लागतात या प्रत्येक कामामध्ये कौशल्ये महत्वाची असतात आणि त्यामुळेच एखादे काम एक व्यक्ती सहज व चांगल्या प्रकारे करते तर तेच काम दुसरी व्यक्ती तितकेच कुशलपणे व प्रभावी करेलच असे नाही आणि हा फरक केवळ ते काम करण्याचे कौशल्य त्यांच्याकडे असणे व नसणे यामुळे आहे. त्यामुळे ज्याच्याकडे ते काम करण्याचे कौशल्य चांगले आहे ती व्यक्ती आपल्या अंगी असलेल्या कौशल्याच्या मदतीने जीवनात अधिक यशस्वी होते. 

   कौशल्यांचे अशा स्वरूपाचे महत्व असल्यामुळे आपला आजचा जादुई विचार होता “तुमच्या अंगी असलेले योग्य कौशल्य व ते कौशल्य संपादन करण्यासाठी तुम्ही घेतलेले कष्ट हेच तुम्हाला नेहमी तारते” 

श्री.दिलीप आप्पासो माने