Saturday, 10 August 2019

केंद्रशाळा उभादांडा नं.1 शाळेतील मुलांच्या पालकांसाठी 'आनंददायी पालकत्व' कार्यशाळा




                'आनंददायी पालकत्व' कार्यशाळा


प्रति ,   
  श्री./श्रीम............................................................
   आपली मुले सर्वगुण संपन्न होऊन इतरांबद्द्ल सहानुभूती दाखवणारी व्हावीत, त्यांनी स्वत:ची प्रगती करावी. असे प्रत्येक आई-वडिलांना वाटत असते. व आपल्या मुलांना तशा प्रकारे बनवण्यासाठी पालक या नात्याने आपण सतत प्रयत्न करत असतो. मात्र काही वेळा मुलांच्या वाढीच्या वेगवेगळ्या टप्प्यावरती असे वाटते की पालक म्हणून मुलांना चांगले घडवण्यासाठी आपण जे प्रयत्न करत आहोत ते कुठे कमी तरी पडत नाहीत ना? मुलांचे व्यक्तिमत्व आदर्श घडवण्यासाठी आणखी कोणते प्रयत्न करावे बरे? मुलांना अभ्यासाची आवड कशी लावावी? आपल्या मुलांचे भविष्य कसे असेल ? यासारखे अनेक प्रश्न आपल्या मनात निर्माण होऊ लागतात. व यातूनच पालकत्वचा आपल्यावर हळू हळू ताण येऊ लागतो.
   हा ताण दूर करून पालकत्व आनंददायी बनवण्याच्या दृष्टीने पालकत्व आनंददायी बनवू 
इच्छिना-या केंद्रशाळा उभादांडा नं.1 शाळेतील मुलांच्या पालकांसाठी त्यांच्या मार्गदर्शनासाठी आनंददायी पालकत्व  या कार्यशाळेचे  आयोजन मंगळवार दि. 13/08/2019 रोजी केंद्रशाळा उभादांडा नं.1 येथे दुपारी 3.00 वाजता केले आहे तरी पालकत्व म्हणजे का? मुलांच्या वाढीचे (विकासाचे) टप्पे व त्या त्या टप्प्यावरती पालक म्हणून आपले वर्तन कसे असावे? सकारात्मक पालकत्वाचे उपाय जाणून घेऊन आपल्या पाल्यामध्ये अभ्यासाची तसेच अन्य कामाची आवड निर्माण करून त्यांच्यामध्ये सकारात्मक बदल घडवून आणण्याच्या दृष्टीने सदर कार्यशाळेस उपस्थित रहावे.   
 धन्यवाद...!
  श्री. दिलीप आप्पासो माने.                                          मुख्याध्यापक
                                                             श्री झिलू महादेव घाडी

Thursday, 10 January 2019

‘आनंददायी पालकत्व’ लेखमाला भाग- 8

‘आनंददायी पालकत्व’ लेखमाला भाग- 8

 मुलांच्या विकासाच्या ( वाढीच्या ) टप्प्यावरती पालकांनी करावयाच्या गोष्टी :-

मुलांचे ऐकावयास तत्पर असणे – 
   ज्या प्रमाणे मोठ्या माणसांचे स्वत:चे काही विचार ,मते असतात त्याच प्रमाणे आपल्या मुलांचे देखील एखाद्या घटनेसंदर्भातचे , प्रसंगासंदर्भातचे वैयक्तिक काही विचार अथवा मते असतात. मुलांचे हे विचार , मते त्यांच्या वयानुसार असतात. त्यामुळे काही आपल्या मुलांनी मांडलेले विचार घरातील मोठी मंडळी निरर्थक समजून त्याच्याकडे दुर्लक्ष करतात किंवा त्यांच्यावरती ओरडून मत , विचार मांडण्यापासून मध्येच रोखले जाते. मुलांच्या विचारांच्या बाबतीत अशा प्रकारची पालकांची वर्तवणुक जर पुन्हा पुन्हा होत असेल. तर मुले हळू-हळू आपली मते कुटुंबातील व्यक्तींच्या समोर मांडणे सोडून देतात. कारण त्यांच्या मनात अशी भावना निर्माण होते की आपल्या विचारांना कोणत्याच प्रकारचे महत्व नाही, आपले विचार चूकीचे आहेत. तसेच काही मुलांच्या मनात अशी भावना निर्माण होऊ शकते की घरात आपल्याला आपल्या विचारांना किंमत नाही. व हा निर्माण झालेला न्यूनगंड मुलांच्या पुढील वाढीच्या टप्प्यात घातक ठरतो. त्यामुळे मुले ज्यावेळीस आपले विचार मांडत असतील तर आई-वडीलांनी सर्वप्रथम ऐकून घ्यावेत व नंतर मुलांच्या त्या विचारवती योग्य अशी सकारात्मक प्रतिक्रिया द्यावी. “तू गप्प बस.!” , “तुला काही कळत नाही.” ,” मोठ्या माणसात तुझे काय काम आहे? ” अशा नकारात्मक प्रतिक्रियांऐवजी सर्वप्रथम तो / ती काय म्हणते ते ऐकून घ्या नंतर त्याच्या/ तिच्या वयाचा विचार करता त्याचे मत किती योग्य वा अयोग्य आहे ते पहावे. व त्याचे मत योग्य असल्यास त्याला प्रोत्साहन देण्यासाठी “ अरे वा चांगली कल्पना आहे.” , “ आपण या मतावरती विचार करूया.” अशा सकारात्मक प्रतिक्रिया दिल्यास त्याच्या विचारांना चांगलीच प्रेरणा मिळेल व पुढील वेळेस अधिक चांगले विचार , कल्पना तो आपल्या समोर मांडेल. 
   काही वेळा मुलांचे विचार ,मत, कल्पना चूकीच्या असतील तर त्याच्या विचारमध्ये योग्य ते बदल करून नंतर त्यांचा स्विकार करावा जेणेकरून तो निराश न होता योग्य विचार कसे करावेत ते शिकेल उदा. आपण त्याला/ तिला असे म्हणू शकतो की “ तू जे विचार मांडलेस थोडेसे योग्य आहे ,मात्र त्याच्यात जर आपण  असा................ बदल केला तर अधिक चांगले होईल.” 
   अशा प्रकारे नेहमी मुले काय म्हणतात , काय बोलतात हे जर आपण ऐकावयास तत्पर असू तर त्यांचे विचार आपल्याला कळतील व त्यांचे विचार जर योग्य असतील तर चांगलीच बाब आहे. मात्र जर तसे नसेल आपण मुलांच्या विचारांमध्ये योग्य तो सकारात्मक बदल करण्यासाठी प्रयत्न करू शकतो. त्यामुळेच नेहमी मुले आपल्याशी काय बोलतात ते ऐकावे.