Wednesday, 30 September 2020

मुलांचे ऐकावयास तत्पर असणे

आनंददायी पालकत्वाची 21 तत्वे 

 तत्व क्र. 3 

  मुलांचे ऐकावयास तत्पर असणे 


 

      पालकत्व आनंददायी बनवण्यासाठी उपयुकत असणा-या  21 तत्वापैकी दुसरे तत्व मागील भागात आपण पाहिले ते म्हणजे मुलांशी संवाद साधण्यासाठी खास वेळ काढणे...! मात्र या खास वेळेत पालाकांनी केवळ आपलेच विचार मुलांसमोर मांडायचे नाहीत तर मुलांचे विचार देखील समजून घ्यायचे आहेत त्यामुळे पालकत्व आनंददायी बनवण्यासाठी उपयुकत असणा-या  21 तत्वापैकी तिसरे तत्व आज आपण पाहणार आहोत ते म्हणजे मुलांचे ऐकावयास तत्पर असणे ...!

 

     ज्या प्रमाणे मोठ्या माणसांचे स्वत:चे काही विचार ,मते असतात त्याच प्रमाणे आपल्या मुलांचे देखील एखाद्या घटनेसंदर्भातचे , प्रसंगासंदर्भातचे वैयक्तिक काही विचार अथवा मते असतात. मुलांचे हे विचार , मते त्यांच्या वयानुसार असतात. अनेकवेळा मुले आपले विचार पालकांच्या अमोर मांडत असताना घरातील मोठी मंडळी त्यांच्या विचारांना , मतांना निरर्थक समजून त्याच्याकडे दुर्लक्ष करतात किंवा त्यांच्यावरती ओरडून मत , विचार मांडण्यापासून मध्येच रोखले जाते. मुलांच्या विचारांच्या बाबतीत अशा प्रकारची पालकांची वर्तवणुक जर पुन्हा पुन्हा होत असेल. तर मुले हळू-हळू आपली मते कुटुंबातील व्यक्तींच्या समोर मांडणे सोडून देतात. कारण त्यांच्या मनात अशी भावना निर्माण होते की आपल्या विचारांना कोणत्याच प्रकारचे महत्व नाही, आपले विचार चूकीचे आहेत. तसेच काही मुलांच्या मनात अशी भावना निर्माण होऊ शकते की घरात आपल्याला,  आपल्या विचारांना किंमत नाही. व हा निर्माण झालेला न्यूनगंड मुलांच्या पुढील वाढीच्या टप्प्यात घातक ठरतो. त्यामुळे मुले आपले विचार मांडत असतील तर आई-वडीलांनी सर्वप्रथम त्यांचे म्हणणे ऐकून घ्यावे व नंतर मुलांच्या त्या विचारवती योग्य अशी सकारात्मक प्रतिक्रिया द्यावी. 

        `“तू गप्प बस.!” , “तुला काही कळत नाही.” ,” मोठ्या माणसात तुझे काय काम आहे? ” अशा नकारात्मक प्रतिक्रियांऐवजी सर्वप्रथम तो / ती काय म्हणते ते ऐकून घ्या नंतर त्याच्या/ तिच्या वयाचा विचार करता त्याचे मत किती योग्य वा अयोग्य आहे ते पहावे. व त्याचे मत योग्य असल्यास त्याला प्रोत्साहन देण्यासाठी “ अरे वा चांगली कल्पना आहे.” , “ आपण या मतावरती विचार करूया.” अशा सकारात्मक प्रतिक्रिया दिल्यास त्याच्या विचारांना चांगलीच प्रेरणा मिळेल व पुढील वेळेस अधिक चांगले विचार , कल्पना तो आपल्या समोर मांडेल. 

   काही वेळा मुलांचे विचार ,मत, कल्पना चूकीच्या असतील तर त्याच्या विचारमध्ये योग्य ते बदल करून नंतर त्यांचा स्विकार करावा जेणेकरून तो निराश न होता योग्य विचार कसे करावेत ते शिकेल उदा. आपण त्याला/ तिला असे म्हणू शकतो की “ तू जे विचार मांडलेस ते थोडेसे योग्य आहे ,मात्र त्याच्यात जर आपण  असा................ बदल केला तर अधिक चांगले होईल.” 

   अशा प्रकारे नेहमी मुले काय म्हणतात , काय बोलतात हे जर आपण ऐकावयास तत्पर असू तर त्यांचे विचार आपल्याला कळतील व त्यांचे विचार जर योग्य असतील तर चांगलीच बाब आहे. मात्र जर तसे नसेल तर आपण मुलांच्या विचारांमध्ये योग्य तो सकारात्मक बदल करण्यासाठी प्रयत्न करू शकतो. त्यामुळेच नेहमी मुले आपल्याशी काय बोलतात ते ऐकावे. आणि म्हणूनच  

    पालकत्व आनंददायी बनवण्यासाठी उपयुकत असणा-या  21 तत्वापैकी तिसरे तत्व आज आपण पाहिले ते म्हणजे मुलांचे ऐकावयास तत्पर असणे ...! धन्यवाद...!     


Thursday, 3 September 2020

जादुई वि४ - भाग 1

 जादुई विचार - भाग 1



“तुमच्या अंगी असलेले योग्य कौशल्य व ते कौशल्य संपादन करण्यासाठी तुम्ही घेतलेले कष्ट हेच तुम्हाला नेहमी तारते”

   शर्टाला बटन लावण्यापासून ते स्पेस मध्ये सोडल्या जाणा-या रॉकेटची निर्मिती अशा प्रत्येक कृतीमध्ये कौशल्य असणे गरजेचे आहे. खूप वेळा एखाद्या कृतीचे ज्ञान असणे म्हणजेच कौशल्य प्राप्त झाले असे समजले जाते. मात्र ज्ञान वेगळे व कौशल्य वेगळे.  ज्ञान म्हणजे एखाद्या विषयाची/गोष्टीची माहिती असणे. व प्राप्त ज्ञानाचा दैनंदिन जीवनात सहजतेने वापर करणे म्हणजे कौशल्य होय. तसेच कौशल्य म्हणजे अशा स्वरूपाची क्षमता जीच्या माध्यमातून आपल्याकडे असलेल्या ज्ञानाचा उपयोग करणे तसेच समस्यांचे निराकरण करणे  ज्ञान व कौशल्य या दोन्ही बाबी एकमेकांवर अवलंबून आहेत. कौशल्याशिवाय ज्ञान निरोपयोगी आहे. 

   वरील फोटोमधील हरणांचेच उदाहरण घेतले तर या शाकाहारी प्राण्याला जंगलातील इतर मांसाहारी प्राण्यांपासून स्वत:चे रक्षण करण्यासाठी काही कौशल्ये असणे आवश्यक आहेत. आणि ती कौशल्ये म्हणजे इतर मांसाहारी प्राण्यांपेक्षा वेगाने धावणे , चपळता , चकवा देणे , सावध असणे. हीच कौशल्ये त्याला जंगलातील जीवन जगण्यासाठी सर्वप्रथम उपयोगी पडतात. आणि म्हणूनच ही कौशल्ये ज्या हरणाकडे जीतकी चांगली तीतके त्याचे जंगलातील जीवन जगण्याचा कालावधी अधिक मात्र ही कौशल्ये एका दिवसात त्याला प्राप्त झालेली नसतात. जन्माला आल्यापासून अशी कौशल्ये मिळवण्यासाठी सराव व प्रयत्न हरणाची पिले करत असतात त्यामुळेच या पिलांचे लक्ष खाण्यापिण्यापेक्षा जास्त उड्या मारणे, धावणे, चकवा देणे यासारख्या खेळामध्ये असते व याच्यातून हळूहळू त्यांच्यामध्ये या कौशल्यांचा विकास होतो. व अशी प्राप्त कौशल्येच त्याला भविष्यात जंगलातील इतर मांसाहारी प्राण्यांपासून सुरक्षीत ठेवण्यास उपयोगी ठरते.  

   याच पद्धतीने आपल्याही जीवनात स्वत:च्या अंगी असलेली विविध कौशल्ये आपले जीवन सुखकर करण्यास मदत करतात. मात्र अशी कौशल्ये संपादन करण्यासाठी सर्वप्रथम आपल्या अंगी असलेल्या क्षमतांचा विचार करावा लागतो. त्याच्यानंतर आपल्या क्षमतेसोबतच कोणत्या गोष्टींची/.कृतींची आवड आहे याचादेखील विचार करणे आवश्यक आहे कारण पुढे त्या कृती करण्याचे कौशल्य संपादन करण्यासाठी आपल्यातील क्षमतेनुसार सराव करत असताना जर त्या गोष्टीची/कृतीची आपल्याला आवड नसेल तर दीर्घ काळापर्यंत त्याचा सराव करण्याचा कंटाळ येऊ शकतो व अशावेळी ते कौशल्य संपादन करण्यासाठी केला जाणारा सराव मध्येच बंद केला जातो. मात्र आपल्या आवडीची कृती करताना कंटाळा येत नाही व अशा कृतीचा सराव केल्याने त्याचे कौशल्या आपल्या अंगी बाणवले जाते म्हणूनच आपल्या आवडीचा देखील विचार करणे गरजेचे आहे. व त्याच्यानंतर सराव आणि हा सराव ते कौशल्य जो पर्यंत चांगाल्या प्रकारे प्राप्त होत नाही तोपर्यंत करणे आवश्यक आहे.  

क्षमता

   

आवड

   

सराव/कष्ट

    

कौशल्य

    कौशल्ये ही वेगवेगळ्या प्रकारची असतात उदा. गायन, वादन, चित्र काढणे, नाचणे, खेळणे, संगणकावर प्रोर्गामिंग करणे, (शर्टाला बटन लावण्यापासून ते स्पेस मध्ये सोडल्या जाणा-या रॉकेटची निर्मिती अशा सर्व कामांमध्ये कौशल्य लागतेच ) 

     दैनंदिन जीवनात विविध कामे आपल्याला करावी लागतात या प्रत्येक कामामध्ये कौशल्ये महत्वाची असतात आणि त्यामुळेच एखादे काम एक व्यक्ती सहज व चांगल्या प्रकारे करते तर तेच काम दुसरी व्यक्ती तितकेच कुशलपणे व प्रभावी करेलच असे नाही आणि हा फरक केवळ ते काम करण्याचे कौशल्य त्यांच्याकडे असणे व नसणे यामुळे आहे. त्यामुळे ज्याच्याकडे ते काम करण्याचे कौशल्य चांगले आहे ती व्यक्ती आपल्या अंगी असलेल्या कौशल्याच्या मदतीने जीवनात अधिक यशस्वी होते. 

   कौशल्यांचे अशा स्वरूपाचे महत्व असल्यामुळे आपला आजचा जादुई विचार होता “तुमच्या अंगी असलेले योग्य कौशल्य व ते कौशल्य संपादन करण्यासाठी तुम्ही घेतलेले कष्ट हेच तुम्हाला नेहमी तारते” 

श्री.दिलीप आप्पासो माने  


Monday, 24 August 2020

मुलांशी संवाद साधण्यासाठी खास वेळ काढणे...!

 आनंददायी पालकत्वाची 21 तत्वे 

तत्व क्र. 2 

मुलांशी संवाद साधण्यासाठी खास वेळ काढणे...!


   पालकत्व आनंददायी बनवण्यासाठी उपयुकत असणा-या  21 तत्वापैकी दुसरे तत्व आहे मुलांशी संवाद साधण्यासाठी खास वेळ काढणे...!


   वेळ ही अशी गोष्ट आहे जी एकदा निघून गेली की तीच वेळ परत मिळत नही म्हणून मुलांना त्यांच्या बालपणात द्यावयाचा वेळ त्या त्या वेळी देणे आवश्यक आहे. तुम्ही मुलांबरोबर बराच वेळ घालवत असला, तरीही त्यातला खूपसा भाग हा सहज बरोबर असण्याचा असतो. मात्र असा वेळ आणि मुद्दाम ठरवून मुलांशी जोडून घेण्याकरता आपण जो खास वेळ काढतो त्यात फरक आहे. मुलांच्या बालपणाच्या काळातच अनेक पालकांचा नोकरी , व्यवसायातील देखील प्रगतीचा कालवाधी असतो त्यामुळे त्यांचे जादातर लक्ष आपल्या नोकरी,  व्यवसायात असल्याने मुलांना वेळ देणे शक्य होत नाही. मात्र आपल्या कामाबरोबरच आपल्या कुटुंबाला , मुलांना देखील योग्य वेळ देणे आवश्यक आहे. मुलांना वेळ देणे म्हणजे केवळ शरीराने त्यांच्यासोबत असणे नव्हे तर मानसिकदृष्ट्या ही पालकांनी त्यांचासोबत असणे होय. अनेक पालक भरमसाट पैसा खर्च करून मुलांना विविध प्रकारच्या गमती जमती पुरवतात मात्र पैशाच्या मदतीने मुलांना क्वालिटी लाईफ देणे शक्य नाही हे पालकांनी लक्षात घ्यायला हवे.  मुलांना काय हवे असते तर प्रेम , स्वातंत्र्य, सन्मान , स्वत:चे कौतुक आणि यासाठी पालकांनी दिलेला खास वेळ,  क्वालिटी टाईम .

      क्वालिटी टाईम म्हणजे मुलांच्या सहवासात राहून त्यांना असे अनुभव देणे  ज्याद्वारे  त्यांना आनंदप्राप्ती होईल व ते अनुभव ,प्रसंग त्यांच्या दिर्घकाळ स्मरणात राहून त्यांच्या भविष्याच्या वाटचालीमध्ये त्यांना उपयोगी ठरतील. त्यामुळे याठिकाणी तुम्ही त्यांना किती वेळ देतात यापेक्षा कसा वेळ देता हे महत्वाचे आहे. कारण  समजून चला एखादा पालक त्याच्या मुलांना दिवसातील दोन ते तीन तास वेळ देतात मात्र या कालावधी मध्ये ते मुलांना त्यांच्या मनाप्रमाणे वागू न देता फक्त आणि फक्त आपल्याला ज्या हव्या आहेत त्याच कृती करून घेतात अशावेळी त्यांचा सहवास मुलांना हवासा वाटेल का ? तर निश्चितच नाही. कारण ते या वेळेत एकप्रकारे मुलांच्या डोक्यावर बसलेले असतात. तर दुसरे पालक आहेत जे दिवसातील फक्त अर्धाच तास मुलांना देतात मात्र या वेळेत मुलांचे विचार , मते व आपले विचार या दोन्हीमध्ये एकवाक्यता आणून मुलांना आनंदी अनुभव देतात.  त्यामुळे अशा पालकांचा सहवास मुलांना आपोआपच हवासा वाटेतो. म्हणून या वेळाची आखणी अत्यंत कल्पकतेने करणे आवश्यक आहे . मुलांबरोबर तुम्हाला काय करायला आवडेल अशा गोष्टींची आधी यादी करा. मुलांनाही अशी यादी करू दे. त्यानंतर ही यादी दोघे मिळून पक्की करा. 

     मुलांना क्वालिटी टाईम देत असताना त्यांचासोबत आपण अनेक गोष्टी करू शकतो उदा. मुलांसोबत खेळणे त्यांच्याशी गप्पागोष्टी करणे , त्यांना विविध अनुभव, प्रसंग सांगणे त्यांना बाहेर फिरायला घेवून जाणे अशा अनेक कृती  आपल्या खास वेळेत करता येतील मात्र या गोष्टी करत असताना पालकांनी मुलांशी पूर्णपणे एकरूप होवून जाणे महत्वाचे आहे. कारण क्वालिटी टाईम म्हणजे पालकांनी मुलांना व मुलांनी पालकांना मनापासून एखादी गोष्ट शिकवणे होय.

     मुलांना जर क्वालिटी लाईफ द्यायची असेल तर सर्वप्रथम त्यांना क्वालिटी टाईम म्हणजेच खासवेळ देणे आवश्यक आहे.  चला तर मग आपल्या मुलांना जास्तीत जास्त क्वालिटी टाईम देता येईल याचे नियोजन करुया व मुलांच्या प्रगतीला गती देऊया . पालकत्व आनंददायी बनवण्यासाठी उपयुकत असणा-या  21 तत्वापैकी दुसरे तत्व आज आपण पाहिले ते म्हणजे मुलांशी संवाद साधण्यासाठी खास वेळ काढणे...!


Friday, 24 July 2020


मुलं जे बघतात तेच शिकतात...!

आनंददायी पालकत्वाची 21 तत्वे :-
तत्व क्र. 1 
मुलं जे बघतात तेच शिकतात...! 

     आपले मूल मोठे होऊन यशस्वी व इतरांबद्दल सहानुभूती असलेली व्यक्ती बनलेली पाहणे, पालक म्हणून तुमच्याकरता किती समाधानकारक असेल याची कल्पना करा...! आपल्या मुलांचा व्यक्तिमत्व विकास व्हावा असे प्रत्येक पालकांना वाटते मात्र व्यक्तिमत्व विकास म्हणजे केवळ भौतिक यश, भरपूर पैसा मिळवण्याची क्षमता, नावलौकिक मिळवण्यासाठीची क्षमता निश्चितच नव्हे. ह्या गोष्टी महत्वाच्या आहेतच परंतु त्याचबरोबर चांगला, जबाबदार नागरिक होणं, समाजाप्रती संवेदनाशील बनणं तसेच कोणत्याही परिस्थितीत शांत व आनंदी राहू शकणारं सकारात्मक आणि कणखर व्यक्तिमत्व बनणं हे जास्त महत्वाचं. आयुष्यातील चढउतार, यश अपयश सहज स्वीकारता येण्याची क्षमता प्राप्त करणे महत्वाचे.  व्यक्तिमत्व विकास विशिष्ठ प्रयत्नांनी करता येतो. पण हे स्वप्न साकार करायचे असेल, तर तुम्ही आपल्या मुलांपुढे कशाप्रकारचा आदर्श ठेवता; त्यांच्यासोबत तुम्ही कितपत वेळ घालवता, त्यांना आपले विचार व भावना मोकळेपणाने सांगता किंवा नाही आणि कशा पद्धतीने सांगता यासारख्या अनेक गोष्टींचा विचार करणे आवश्यक आहे. आई वडील हे मुलांचे पहिले गुरू असतात त्यामुळे एक गुरू या नात्याने आपली भूमिका तुम्ही कशाप्रकारे निभावता हे विचारात घ्यावे लागेल. यासाठी आपल्याला मदतगार ठरतील ती म्हणजे ‘आनंददायी पालकत्वाची 21 तत्वे’ आणि या 21 तत्वापैकी पहिले तत्व आहे 
मुलं जे बघतात तेच शिकतात...! (बच्चे जो देखते है वही सिखते है)

   मुलं आपण जे सांगतो ते करत नाहीत तर आपण जे करतो ते करतात. 
त्यामुळे घरात ज्या पध्दीचे वातावरण असते त्या वातावरणाचे , परिस्थितीचे मुले निरीक्षण करतात व त्याप्रमाणे स्वत:चे वर्तन बदलतात. 
     पालक या नात्याने आपल्याला आपल्या मुलांकडून वेगवेगळ्या अपेक्षा असतात उदाहरणार्थ मुलांनी योगासने किवा अन्य प्रकारचे व्यायाम करावेत , नियमित अभ्यास करावा , मोबाईचा तसेच TV चा कमीत कमी वापर करावा यासारख्या अनेक गोष्टी मुलांनी कराव्यात असे वाटते व अशाप्रकारची अपेक्षा करण योग्यच आहे. मात्र अनेक वेळा मुलांना अशा बाबतीत सागून देखील त्याप्रमाणे ती वागतीलच असे नाही व अशावेळी आपण मुलांना दोष देऊन मोकळे होतो मात्र या ठिकाणी आपन एक तत्व लक्षात घेत नाही आणि ते म्हणजे ‘मुले आपण जे सांगतो ते करत नाहीत तर आपण जे करतो ते करतात’ मुले जास्तीत जास्त निरीक्षणतून माहिती मिळवत असतात. त्यामुळे घरामध्ये जशा पध्दतीचे वातावरण असते त्या वातावरणाचे , परिस्थितीचे मुले निरीक्षण करतात व त्याप्रमाणे स्वत:चे वर्तन बदलतात. मुले अनुकरण करण्यात तरबेज असतात. त्यामुळे       शैशवावस्था (0 ते 5 वर्ष वयोगट) व बाल्यावस्था ( 6 ते 12 वर्ष वयोगट ) या वयोगटातील मुलांचे आईवडील , पालक हे त्यांचे Role Model असतात. त्यामुळे याठिकाणी पालकांनी मुलांच्या समोर एक आदर्श ठेवणे गरजेचे आसते. 
    मुले जे बघतात तेच शिकतात हे तत्व जेंव्हा आपल्या लक्षात येते तेंव्हा आपण देखील आपल्या वर्तनामध्ये बदल करून मुलांसमोर चांगल्या कृती करतो. त्यामुळे मुले देखील त्याच पध्द्तीने स्वत:मध्ये बदल करतात.
   मुलांमध्ये जे बदल आपल्याला अपेक्षित आहेत ते बदल सर्वप्रथम स्वत:मध्ये करणे आवश्यक आहे. उदा. मुलांनी जेवताना TV बघू नये असे वाटत असेल तर सर्वप्रथम घरातील इतर लोकांनी जेवताना TV बंद ठेवला पाहिजे. तेंव्हाच मुले देखील जेवताना TV बघणार नाहीत. याप्रकारेच इतर बाबती देखील मुलांसमोर पालकांना आदर्श ठेवता येतील. आणि ते ठेवणे आवश्यक आहे कारण मुले निरीक्षणातून जास्तीत जास्त माहिती मिळवत असतात.
    पालकत्व आनंददायी बनवण्यासाठी उपयुकत असणा-या  21 तत्वापैकी पहिले तत्व आहे मुलं जे बघतात तेच शिकतात...! (बच्चे जो देखते है वही सिखते है)
हे तत्व जेव्हा आपण लक्षात घेतो तेंव्हा आपल्या व मुलांच्या वर्तनात निश्चितच बदल होवू लागतो. 
  धन्यवाद...!

Friday, 17 July 2020

आनंददायी पालकत्वाची 21 तत्वे

आनंददायी पालकत्वाची 21 तत्वे :-👉


              आई वडील होणे ही निसर्गाने दिलेली मानवाला सुंदर अशी देणगी आहे मानवाच्या आनंदात वाढ करण्यासाठीच अशी योजना निसर्गाने केली आहे. आई वडिलांच्या या नात्याबरोबरच पालकत्वाची जबाबदारीसुद्धा आपोआपच येते मात्र सुरुवातीला मुलांच्या जन्माबरोबर आनंदाने घेतलेली ही जबाबदारी काहीवेळा दु:खाला ,त्रासाला कारणीभूत आहे की काय असे वाटू लागते कारण मुलांच्या वाढीच्या विविध ट्प्प्यावरती त्यांचे शिक्षण , आरोग्य,  मुलांमध्ये होणारे शारीरिक मानसिक बदल एकूणच त्यांच्या भविष्याच्या काळजीमुळे , पालकांचे मानसिक तसेच शरीरिक स्वास्थ्य बिघडते, व अशावेळी प्रश्न पडतो की खरेच पालकत्व हे आनंददायी आहे का? व हाच प्रश्न घेऊन पालक हे आपल्या पाल्याच्या शिक्षकांकडे किंवा मित्रपरिवारातील ,नात्यातील लोकांकडे जातात व त्याचे उत्तर मिळविण्याचा प्रयत्न करतात, तसेच काही पालक हे पालकत्वासंदर्भात उपलब्ध असणा-या पुस्तकांचा आधार घेतात मात्र सर्वच पालकांना पालकत्वासंदर्भातील पुस्तके वाचणे शक्य नसल्यामुळे या प्रश्नाचे उत्तर मिळतेच असे नाही.
        पालकत्व हे आनंददायी आहे किंवा ते कशाप्रकारे आनंददायी , सोपे बनवता येईल हे जर एकदा पालकांना समजले तर त्यांच्या आनंदी पालकत्वाचा परिणाम हा त्यांच्या पाल्यावर आपोआपच दिसून येतो आनंददायी पालकांच्या सहवासातील मुले ही अन्य मुलांच्या तुलनेने अधिक प्रभाविपणे आपले काम करतात अशी मुले ही कोणत्याही परिस्थितीत सकारात्मक राहून स्वत:च्या  शारीरिक, मानसिक, बौद्धिक विकासाबरोबरच समाजाच्या विकासाला देखील हातभार लावतात. त्यामुळेच पालकत्व आनंददायी बनवण्यासाठी उपयुक्त असणारी 21 तत्वे व्हिडीयो सिरीज च्या माध्यमातून आपल्या समोर घेऊन येत आहोत ‘ आनंददायी पालकत्वाची 21 तत्वे’ 
आनंददायी पालकत्वासंदर्भातील 21 तत्वे कोणती आहेत व ती कशा प्रकारे आपल्याला मदत करतात हे जाणून घेण्यासाठी निश्चित बघा Youtube वरील व्हिडीयो सिरीज ‘ आनंददायी पालकत्वाची 21 तत्वे’  धन्यावाद..! 

Wednesday, 6 May 2020

सध्याच्या परिस्थिती मध्ये मुलांच्या शिकण्या संदर्भात मनात प्रश्न निर्माण झालेल्या पालकांसाठी (कोवळ्यांचे शिक्षण रोखले तर नाही ना?)

                                      कोवळ्यांचे शिक्षण   
                                     रोखले तर 
                                              नाही ना ?

       सध्याच्या परिस्थितीमध्ये कोरोनामुळे संपूर्ण जगाची गती मंदावली असताना मुलांच्या शाळादेखील बंद आहेत त्यामुळे अनेक पालकांच्या मनात हा प्रश्न निर्माण झाला आहे की ‘मुलांचे शिक्षण थांबले तरी नाही ना?’ पालक या नात्याने हा प्रश्न मनात येणे स्वाभाविकच आहे. मात्र खरचं अशा अचानक आलेल्या या वैश्विक संकटामुळे मुलांचे शिक्षण थांबले आहे का ? की ते चालू आहे हे जाणून घेण्यापूर्वी,  शिक्षण म्हणजे काय ? हे सर्वप्रथम जाणून घेवूया वेगवेगळ्या शिक्षण तज्ञानी, थोर व्यक्तिंनी शिक्षणासंदर्भात विविध व्याख्या केल्या आहेत त्यातीलच स्वामी विवेकानंद म्हणत – “ केवळ डोक्यात माहिती भरणे म्हणजे शिक्षण नव्हे तर मानवामध्ये सुप्त अवस्थेत असलेल्या दैवी पूर्णत्वाचे प्रकटीकरण म्हणजे शिक्षण.” तसेच रविंद्रनाथ टागोर म्हणत – “ उच्च प्रतिचे शिक्षण म्हणजे जे केवळ महितीच देत नाही तर सर्व चराचर सृष्टीशी आपल्या जीवनाचा मेळ घालून देते.” या व अशा अनेक शिक्षणाच्या व्याख्यांचा अभ्यास केल्यावर आपल्या हे लक्षात येते की केवळ पुस्तकी माहिती डोक्यात भरणे म्हणजे शिक्षण नव्हे. कारण पुस्तक हे शिक्षणाचे एक साधन आहे साध्य नव्हे. त्यामुळे आपण पालकांनी हे लक्षात घ्यायला हवे की मुलांचे शिक्षण हे शाळेबरोबरच घर, परिसर, समाज इत्यादी विविध स्तरावरती सतत सुरू असते. याचे उत्तम उदाहरण म्हणजे मुल शाळेत जाण्यापूर्वी अनेक गोष्टी (चालणे, बोलणे,) घरातील व्यक्तींच्या, समाजाच्या, परिसराच्या सानिध्यातूनच शिकलेले असते. त्यामुळे सध्याच्या या परिस्थिती मध्ये देखील मुलांचे शिक्षण सुरूच आहे कारण मुले सध्या जरी शाळेपासून दूर असली तरी शिक्षणापासून किंवा शिकण्यापासून दूर नाहीत कारण ती सध्या देखील आपल्या घरामध्ये,समाजामध्ये विविध गोष्टीचे ज्ञान घेत आहेत. मुले निरीक्षण,विचार, कृती,संवाद,खेळ इत्यादी विविध माध्यमाच्या आधारे सतत ज्ञान, महिती मिळवत असतात. अशा प्राप्त माहितीला प्रतिसाद देताना आपोआपच त्याच्यातील लपलेल्या सुप्त नैसर्गिक गुण प्रकट होवू लागतात व हे गुण प्रत्येक मुलांमध्ये वेगवेगळे असतात त्यामुळेच एखाद्या घटनेला प्रत्येक मुल वेगळ्या पध्दतीने प्रतिसाद देते. यातूनच प्राप्त ज्ञानाच्या आधारे मुल नवनवीन कलाकृतीची निर्मिती करू लागते उदा. चित्रे काढणे, गाणे म्हणने, एखादे वाद्य वाजवणे, मातीपासून किंवा कागदापासून वस्तू तयार करणे, एखादा नवीन खेळ खेळणे. आणि या कलाकृतींची निर्मिती करताना त्याच्या आजूबाजूला उपलब्ध साधनसामूग्रीचा ते वापर करते त्यामुळेच मुले घरातील भांड्यांचा वाद्यासारखा वापर करून ती वाजवतात, अनेक घरातील मुले घरातील भिंतीचा कॅनव्हास सारखा वापर करतात व भिंतीवर विविध चित्रे काढतात. अशावेळी अनेक घरात त्या बालकासोबत कसा संवाद साधला जातो हे सांगायला नको. अशा प्रकारे नवीन रचनांची, कलाकृतींची निर्मिती हे देखील शिक्षणच आहे. कारण अशा कृती करताना त्याच्यादेखील चूका होतात किंवा त्याला हवा तसा बदल त्याच्या कलाकृतीमध्ये आलेला दिसत नाही त्यामुळे त्याच्या कृतीमध्ये कोणते नवीन बदल करावे याचा तो विचार करू लागते किंवा आपल्या आजूबाजूच्या व्यक्तिंना त्याबाबत विचारपूस करते. व पुन्हा ती गोष्ट अधिक चांगल्या प्रकारे कशी करता येईल यासाठी प्रयत्न करते. मुलाचे असे वर्तन शिक्षणाचाच भाग आहे.
    त्यामुळे सध्याच्या काळात देखील मुले घरी आहेत व मुलांना कधीही स्वस्थ बसवत नाही कारण सतत ती नवनवीन गोष्टींच्या, माहिती मिळवण्याच्या शोधात असतात त्यामुळे मुलांच्या अशा कृतींमध्ये पालकांकडून प्रोत्साहनाची किंवा जिथे मुले अडतात अशावेळी थोड्याफार मार्गदर्शनाची (मार्गदर्शन म्हणजे सर्वच कृती मुलाला करून देणे नव्हे.) आवश्यकता असते. खूपवेळा मुलाला अशा गोष्टी /कृती करण्यापासून पालक रोखतात कारण मुलांच्या अशा कृती म्हणजे विशिष्ट प्रकारचा खेळ आहे व त्याला काही अर्थ नाही असा आपला समज असतो. मात्र खेळ हे देखील शिक्षणाचे एक माध्यमच आहे. मात्र मुलांनी केवळ पुस्तक घेऊन वाचणे, वही मध्ये काहीतरी लेखन करणे म्हणजे त्याचे शिक्षण / अभ्यास असे आपल्याला वाटते परंतु याबरोबरच प्रत्येक मुलाची कौशल्ये वेगळी असतात त्याच्या अंगी असणारे सुप्त गुण वेगळे असतात. आणि त्यामुळेच मुले त्यांना आनंद देणारी कृती करायला नेहमी सरसावतात. म्हणून आनंद मिळवणे हेच खरे शिक्षण नव्हे का?
    पालक जेंव्हा आपल्या मुलांच्या अंगी कोणते सुप्त गुण आहेत हे जाणून घेतात व त्याच्या गुणानुसार त्याला योग्य असे मार्गदर्शन व प्रोत्साहन देतात अशी मुले आपल्या आवडीच्या गोष्टी करत असतानाच त्यातुन अनेक मूल्यांचे ज्ञान देखील मिळवतात. त्यामुळे सध्याच्या या परिस्थिती मध्ये पालकांनी मुलांचे शिक्षण थांबले की काय ? या प्रश्नात अडकून न पडता सध्या आपण सर्वजण घरी असल्यामुळे मुले देखील नेहमी पेक्षा जास्त आपल्या सहवासात आहेत त्यामुळे त्यांना जास्तीत जास्त क्वालिटी टाइम कसा देता येईल याकडे लक्ष देवून त्यांच्याशी संवाद साधून मुलांच्या स्वत:च्या कृती व खेळासोबतच आपल्या लहापणीचे खेळ त्यांच्यासोबत खेळावेत त्यांना गोष्टी सांगाव्यात तसेच मुलांमध्ये नवीन गोष्टी जाणून घेण्याच्या वृत्तीचा विकास करण्यासाठी त्यांना वेगवेगळ्या स्वरूपाचे प्रश्न विचारावेत व त्याचे उत्तर ते कशा प्रकारे मिळवतात हे पहावे यामध्ये देखील आपण अगोदर सांगितल्या प्रमाणे केवळ मार्गदर्शकाची भुमिका घ्यावी व आवश्यक तेथे योग्य ते मार्गदर्शन करावे. तसेच आपल्या घरातील , परिसरातील विविध साधनांच्या मदतीने मुलांना विविध गोष्टींचे (आपली दैनदिन कामे) अनुभव देता येतील अशा पध्द्तीने मुलांना अनुभवात्मक शिक्षण मिळेल व असे ज्ञान माहिती मुलांच्या दीर्घकाळ लक्षात राहील व भविष्यात त्याला या माहितीचा निश्चितच उपयोग होईल. तेव्हा आपण हे लक्षात घेऊया मुलांचे शिक्षण हे कधीच थांबत नाही ते सतत चालू असते कधी औपचारिक तर कधी अनौपचारिक पद्धतीने कारण ‘शिकणं कधी संपत नाही’
                                     धन्यवाद..! 
                                श्री.दिलीप आप्पासो माने
                                    8421699666