Wednesday, 6 May 2020

सध्याच्या परिस्थिती मध्ये मुलांच्या शिकण्या संदर्भात मनात प्रश्न निर्माण झालेल्या पालकांसाठी (कोवळ्यांचे शिक्षण रोखले तर नाही ना?)

                                      कोवळ्यांचे शिक्षण   
                                     रोखले तर 
                                              नाही ना ?

       सध्याच्या परिस्थितीमध्ये कोरोनामुळे संपूर्ण जगाची गती मंदावली असताना मुलांच्या शाळादेखील बंद आहेत त्यामुळे अनेक पालकांच्या मनात हा प्रश्न निर्माण झाला आहे की ‘मुलांचे शिक्षण थांबले तरी नाही ना?’ पालक या नात्याने हा प्रश्न मनात येणे स्वाभाविकच आहे. मात्र खरचं अशा अचानक आलेल्या या वैश्विक संकटामुळे मुलांचे शिक्षण थांबले आहे का ? की ते चालू आहे हे जाणून घेण्यापूर्वी,  शिक्षण म्हणजे काय ? हे सर्वप्रथम जाणून घेवूया वेगवेगळ्या शिक्षण तज्ञानी, थोर व्यक्तिंनी शिक्षणासंदर्भात विविध व्याख्या केल्या आहेत त्यातीलच स्वामी विवेकानंद म्हणत – “ केवळ डोक्यात माहिती भरणे म्हणजे शिक्षण नव्हे तर मानवामध्ये सुप्त अवस्थेत असलेल्या दैवी पूर्णत्वाचे प्रकटीकरण म्हणजे शिक्षण.” तसेच रविंद्रनाथ टागोर म्हणत – “ उच्च प्रतिचे शिक्षण म्हणजे जे केवळ महितीच देत नाही तर सर्व चराचर सृष्टीशी आपल्या जीवनाचा मेळ घालून देते.” या व अशा अनेक शिक्षणाच्या व्याख्यांचा अभ्यास केल्यावर आपल्या हे लक्षात येते की केवळ पुस्तकी माहिती डोक्यात भरणे म्हणजे शिक्षण नव्हे. कारण पुस्तक हे शिक्षणाचे एक साधन आहे साध्य नव्हे. त्यामुळे आपण पालकांनी हे लक्षात घ्यायला हवे की मुलांचे शिक्षण हे शाळेबरोबरच घर, परिसर, समाज इत्यादी विविध स्तरावरती सतत सुरू असते. याचे उत्तम उदाहरण म्हणजे मुल शाळेत जाण्यापूर्वी अनेक गोष्टी (चालणे, बोलणे,) घरातील व्यक्तींच्या, समाजाच्या, परिसराच्या सानिध्यातूनच शिकलेले असते. त्यामुळे सध्याच्या या परिस्थिती मध्ये देखील मुलांचे शिक्षण सुरूच आहे कारण मुले सध्या जरी शाळेपासून दूर असली तरी शिक्षणापासून किंवा शिकण्यापासून दूर नाहीत कारण ती सध्या देखील आपल्या घरामध्ये,समाजामध्ये विविध गोष्टीचे ज्ञान घेत आहेत. मुले निरीक्षण,विचार, कृती,संवाद,खेळ इत्यादी विविध माध्यमाच्या आधारे सतत ज्ञान, महिती मिळवत असतात. अशा प्राप्त माहितीला प्रतिसाद देताना आपोआपच त्याच्यातील लपलेल्या सुप्त नैसर्गिक गुण प्रकट होवू लागतात व हे गुण प्रत्येक मुलांमध्ये वेगवेगळे असतात त्यामुळेच एखाद्या घटनेला प्रत्येक मुल वेगळ्या पध्दतीने प्रतिसाद देते. यातूनच प्राप्त ज्ञानाच्या आधारे मुल नवनवीन कलाकृतीची निर्मिती करू लागते उदा. चित्रे काढणे, गाणे म्हणने, एखादे वाद्य वाजवणे, मातीपासून किंवा कागदापासून वस्तू तयार करणे, एखादा नवीन खेळ खेळणे. आणि या कलाकृतींची निर्मिती करताना त्याच्या आजूबाजूला उपलब्ध साधनसामूग्रीचा ते वापर करते त्यामुळेच मुले घरातील भांड्यांचा वाद्यासारखा वापर करून ती वाजवतात, अनेक घरातील मुले घरातील भिंतीचा कॅनव्हास सारखा वापर करतात व भिंतीवर विविध चित्रे काढतात. अशावेळी अनेक घरात त्या बालकासोबत कसा संवाद साधला जातो हे सांगायला नको. अशा प्रकारे नवीन रचनांची, कलाकृतींची निर्मिती हे देखील शिक्षणच आहे. कारण अशा कृती करताना त्याच्यादेखील चूका होतात किंवा त्याला हवा तसा बदल त्याच्या कलाकृतीमध्ये आलेला दिसत नाही त्यामुळे त्याच्या कृतीमध्ये कोणते नवीन बदल करावे याचा तो विचार करू लागते किंवा आपल्या आजूबाजूच्या व्यक्तिंना त्याबाबत विचारपूस करते. व पुन्हा ती गोष्ट अधिक चांगल्या प्रकारे कशी करता येईल यासाठी प्रयत्न करते. मुलाचे असे वर्तन शिक्षणाचाच भाग आहे.
    त्यामुळे सध्याच्या काळात देखील मुले घरी आहेत व मुलांना कधीही स्वस्थ बसवत नाही कारण सतत ती नवनवीन गोष्टींच्या, माहिती मिळवण्याच्या शोधात असतात त्यामुळे मुलांच्या अशा कृतींमध्ये पालकांकडून प्रोत्साहनाची किंवा जिथे मुले अडतात अशावेळी थोड्याफार मार्गदर्शनाची (मार्गदर्शन म्हणजे सर्वच कृती मुलाला करून देणे नव्हे.) आवश्यकता असते. खूपवेळा मुलाला अशा गोष्टी /कृती करण्यापासून पालक रोखतात कारण मुलांच्या अशा कृती म्हणजे विशिष्ट प्रकारचा खेळ आहे व त्याला काही अर्थ नाही असा आपला समज असतो. मात्र खेळ हे देखील शिक्षणाचे एक माध्यमच आहे. मात्र मुलांनी केवळ पुस्तक घेऊन वाचणे, वही मध्ये काहीतरी लेखन करणे म्हणजे त्याचे शिक्षण / अभ्यास असे आपल्याला वाटते परंतु याबरोबरच प्रत्येक मुलाची कौशल्ये वेगळी असतात त्याच्या अंगी असणारे सुप्त गुण वेगळे असतात. आणि त्यामुळेच मुले त्यांना आनंद देणारी कृती करायला नेहमी सरसावतात. म्हणून आनंद मिळवणे हेच खरे शिक्षण नव्हे का?
    पालक जेंव्हा आपल्या मुलांच्या अंगी कोणते सुप्त गुण आहेत हे जाणून घेतात व त्याच्या गुणानुसार त्याला योग्य असे मार्गदर्शन व प्रोत्साहन देतात अशी मुले आपल्या आवडीच्या गोष्टी करत असतानाच त्यातुन अनेक मूल्यांचे ज्ञान देखील मिळवतात. त्यामुळे सध्याच्या या परिस्थिती मध्ये पालकांनी मुलांचे शिक्षण थांबले की काय ? या प्रश्नात अडकून न पडता सध्या आपण सर्वजण घरी असल्यामुळे मुले देखील नेहमी पेक्षा जास्त आपल्या सहवासात आहेत त्यामुळे त्यांना जास्तीत जास्त क्वालिटी टाइम कसा देता येईल याकडे लक्ष देवून त्यांच्याशी संवाद साधून मुलांच्या स्वत:च्या कृती व खेळासोबतच आपल्या लहापणीचे खेळ त्यांच्यासोबत खेळावेत त्यांना गोष्टी सांगाव्यात तसेच मुलांमध्ये नवीन गोष्टी जाणून घेण्याच्या वृत्तीचा विकास करण्यासाठी त्यांना वेगवेगळ्या स्वरूपाचे प्रश्न विचारावेत व त्याचे उत्तर ते कशा प्रकारे मिळवतात हे पहावे यामध्ये देखील आपण अगोदर सांगितल्या प्रमाणे केवळ मार्गदर्शकाची भुमिका घ्यावी व आवश्यक तेथे योग्य ते मार्गदर्शन करावे. तसेच आपल्या घरातील , परिसरातील विविध साधनांच्या मदतीने मुलांना विविध गोष्टींचे (आपली दैनदिन कामे) अनुभव देता येतील अशा पध्द्तीने मुलांना अनुभवात्मक शिक्षण मिळेल व असे ज्ञान माहिती मुलांच्या दीर्घकाळ लक्षात राहील व भविष्यात त्याला या माहितीचा निश्चितच उपयोग होईल. तेव्हा आपण हे लक्षात घेऊया मुलांचे शिक्षण हे कधीच थांबत नाही ते सतत चालू असते कधी औपचारिक तर कधी अनौपचारिक पद्धतीने कारण ‘शिकणं कधी संपत नाही’
                                     धन्यवाद..! 
                                श्री.दिलीप आप्पासो माने
                                    8421699666