Monday, 16 April 2018

'आनंददायी पालकत्व' लेखमाला भाग 1





आनंददायी पालकत्व  लेखमाला भाग 1

1) आनंददायी पालकत्व म्हणजे काय ? ते समजून घेणे.

बाळाच्या जन्मानंतर आपण आई व वडील होतो. त्या दिवसापासून आपण पालक या नव्या नात्याने प्रेरीत होऊन पालकत्वाचे नाते सांभाळण्यास सुरू करतो. हे पालकत्वाचे नाते म्हणजे आपाली जबाबदारी किंवा कर्तव्य नव्हे तर निसर्गाने आपल्याला आनंदी जीवन जगण्यासाठी केलेली ती एक योजना आहे. परंतू बाळाच्या वाढीच्या पुढील टप्प्यांवरती कधी कधी असे वाटू लागते की निसर्गाने आपल्याला आनंदी जीवन जगण्यासाठी केलेले हे प्रयोजन खरच आपल्या आनंदासाठीच केले आहे ना?
   कारण वाढीच्या पुढील प्रत्येक टप्प्यावरती मुलांचे वर्तन हे वेगळेच असते त्यामुळे मुलांच्या वर्तनबदलाच्या या टप्प्यावरती त्यांचाशी कसे वागावे हाच प्रश्न पालक म्हणून आपल्याला पडतो. परंतू या गोष्टीची चिंता करण्याची गरज नाही. कारण सदर लेखमालेच्या माध्यमातून पालकत्व आनंददायी कसे बनवता येईल आणि हे किती सहज , सुलभ व सोपे आहे हे आपण जाणून घेणार आहोत. आणि मला खात्री आहे की या लेखमालेच्या वाचनातून वाचकांना, प्रत्येक पालकांना नवीन दिशा मिळेल व पालकत्वाचे नाते अधिकाधिक आनंददायी असे बनेल.
   सर्वप्रथम आपण आनंददायी पालकत्व म्हणजे काय ? हे समजून घेऊया . कारण आनंदी पालकच आनंदी पिढी घडवू शकतो पाल्यावर संस्कार करण्यासाठी पालक आणि पाल्य यांच्यात सुसंवाद असायला हवा. स्वत: तणावमुक्त असलेले पालकच आपल्या मुलांना तणावमुक्त जीवन जगायला शिकवू शकतात ,आपल्या पाल्याशी सुसंवाद साधू शकतात.          
   “ आनंददायी पालकत्व म्हणजे आपल्या पाल्यातील उपजत गुणांचा शोध घेऊन त्यांना पाठिंबा व प्रोत्साहन देऊन मुलांना आनंदी बनवून  पुढे नेण्याचा प्रयत्न करणं होय.”
   “ आनंददायी पालकत्वामध्ये मुलांच्या अंगभूत क्षमता ओळखून त्यांच्यातील नैसर्गिक गुणांची जोपासना कशी करता येईल याकडे लक्ष दिले जाते.”
   “ आनंददायी पालकत्वामुळे मुलांची वाढ अत्यंत नैसर्गिकरीत्या व निकोप होते.त्याचबरोबर पालकांना देखील समाधानी व आनंदी जीवन जगण्यास मदत होते.”   
   आनंददायी पालकत्वासाठी कुठलाही शॉर्टकट नाही. काहीजण पालकत्व जाणीवपूर्वक शिकतात, काही आपल्या चुकातून आणि अनुभवातून शिकतात.



श्री.दिलीप आप्पासो माने 
https://successmv.blogspot.in/
8421699666

No comments:

Post a Comment