जादुई विचार - भाग 1
“तुमच्या अंगी असलेले योग्य कौशल्य व ते कौशल्य संपादन करण्यासाठी तुम्ही घेतलेले कष्ट हेच तुम्हाला नेहमी तारते”
शर्टाला बटन लावण्यापासून ते स्पेस मध्ये सोडल्या जाणा-या रॉकेटची निर्मिती अशा प्रत्येक कृतीमध्ये कौशल्य असणे गरजेचे आहे. खूप वेळा एखाद्या कृतीचे ज्ञान असणे म्हणजेच कौशल्य प्राप्त झाले असे समजले जाते. मात्र ज्ञान वेगळे व कौशल्य वेगळे. ज्ञान म्हणजे एखाद्या विषयाची/गोष्टीची माहिती असणे. व प्राप्त ज्ञानाचा दैनंदिन जीवनात सहजतेने वापर करणे म्हणजे कौशल्य होय. तसेच कौशल्य म्हणजे अशा स्वरूपाची क्षमता जीच्या माध्यमातून आपल्याकडे असलेल्या ज्ञानाचा उपयोग करणे तसेच समस्यांचे निराकरण करणे ज्ञान व कौशल्य या दोन्ही बाबी एकमेकांवर अवलंबून आहेत. कौशल्याशिवाय ज्ञान निरोपयोगी आहे.
वरील फोटोमधील हरणांचेच उदाहरण घेतले तर या शाकाहारी प्राण्याला जंगलातील इतर मांसाहारी प्राण्यांपासून स्वत:चे रक्षण करण्यासाठी काही कौशल्ये असणे आवश्यक आहेत. आणि ती कौशल्ये म्हणजे इतर मांसाहारी प्राण्यांपेक्षा वेगाने धावणे , चपळता , चकवा देणे , सावध असणे. हीच कौशल्ये त्याला जंगलातील जीवन जगण्यासाठी सर्वप्रथम उपयोगी पडतात. आणि म्हणूनच ही कौशल्ये ज्या हरणाकडे जीतकी चांगली तीतके त्याचे जंगलातील जीवन जगण्याचा कालावधी अधिक मात्र ही कौशल्ये एका दिवसात त्याला प्राप्त झालेली नसतात. जन्माला आल्यापासून अशी कौशल्ये मिळवण्यासाठी सराव व प्रयत्न हरणाची पिले करत असतात त्यामुळेच या पिलांचे लक्ष खाण्यापिण्यापेक्षा जास्त उड्या मारणे, धावणे, चकवा देणे यासारख्या खेळामध्ये असते व याच्यातून हळूहळू त्यांच्यामध्ये या कौशल्यांचा विकास होतो. व अशी प्राप्त कौशल्येच त्याला भविष्यात जंगलातील इतर मांसाहारी प्राण्यांपासून सुरक्षीत ठेवण्यास उपयोगी ठरते.
याच पद्धतीने आपल्याही जीवनात स्वत:च्या अंगी असलेली विविध कौशल्ये आपले जीवन सुखकर करण्यास मदत करतात. मात्र अशी कौशल्ये संपादन करण्यासाठी सर्वप्रथम आपल्या अंगी असलेल्या क्षमतांचा विचार करावा लागतो. त्याच्यानंतर आपल्या क्षमतेसोबतच कोणत्या गोष्टींची/.कृतींची आवड आहे याचादेखील विचार करणे आवश्यक आहे कारण पुढे त्या कृती करण्याचे कौशल्य संपादन करण्यासाठी आपल्यातील क्षमतेनुसार सराव करत असताना जर त्या गोष्टीची/कृतीची आपल्याला आवड नसेल तर दीर्घ काळापर्यंत त्याचा सराव करण्याचा कंटाळ येऊ शकतो व अशावेळी ते कौशल्य संपादन करण्यासाठी केला जाणारा सराव मध्येच बंद केला जातो. मात्र आपल्या आवडीची कृती करताना कंटाळा येत नाही व अशा कृतीचा सराव केल्याने त्याचे कौशल्या आपल्या अंगी बाणवले जाते म्हणूनच आपल्या आवडीचा देखील विचार करणे गरजेचे आहे. व त्याच्यानंतर सराव आणि हा सराव ते कौशल्य जो पर्यंत चांगाल्या प्रकारे प्राप्त होत नाही तोपर्यंत करणे आवश्यक आहे.
क्षमता
आवड
सराव/कष्ट
![]()
कौशल्य
कौशल्ये ही वेगवेगळ्या प्रकारची असतात उदा. गायन, वादन, चित्र काढणे, नाचणे, खेळणे, संगणकावर प्रोर्गामिंग करणे, (शर्टाला बटन लावण्यापासून ते स्पेस मध्ये सोडल्या जाणा-या रॉकेटची निर्मिती अशा सर्व कामांमध्ये कौशल्य लागतेच )
दैनंदिन जीवनात विविध कामे आपल्याला करावी लागतात या प्रत्येक कामामध्ये कौशल्ये महत्वाची असतात आणि त्यामुळेच एखादे काम एक व्यक्ती सहज व चांगल्या प्रकारे करते तर तेच काम दुसरी व्यक्ती तितकेच कुशलपणे व प्रभावी करेलच असे नाही आणि हा फरक केवळ ते काम करण्याचे कौशल्य त्यांच्याकडे असणे व नसणे यामुळे आहे. त्यामुळे ज्याच्याकडे ते काम करण्याचे कौशल्य चांगले आहे ती व्यक्ती आपल्या अंगी असलेल्या कौशल्याच्या मदतीने जीवनात अधिक यशस्वी होते.
कौशल्यांचे अशा स्वरूपाचे महत्व असल्यामुळे आपला आजचा जादुई विचार होता “तुमच्या अंगी असलेले योग्य कौशल्य व ते कौशल्य संपादन करण्यासाठी तुम्ही घेतलेले कष्ट हेच तुम्हाला नेहमी तारते”
श्री.दिलीप आप्पासो माने

No comments:
Post a Comment