आनंददायी पालकत्वाची 21 तत्वे
तत्व क्र. 2
मुलांशी संवाद साधण्यासाठी खास वेळ काढणे...!
पालकत्व आनंददायी बनवण्यासाठी उपयुकत असणा-या 21 तत्वापैकी दुसरे तत्व आहे मुलांशी संवाद साधण्यासाठी खास वेळ काढणे...!
वेळ ही अशी गोष्ट आहे जी एकदा निघून गेली की तीच वेळ परत मिळत नही म्हणून मुलांना त्यांच्या बालपणात द्यावयाचा वेळ त्या त्या वेळी देणे आवश्यक आहे. तुम्ही मुलांबरोबर बराच वेळ घालवत असला, तरीही त्यातला खूपसा भाग हा सहज बरोबर असण्याचा असतो. मात्र असा वेळ आणि मुद्दाम ठरवून मुलांशी जोडून घेण्याकरता आपण जो खास वेळ काढतो त्यात फरक आहे. मुलांच्या बालपणाच्या काळातच अनेक पालकांचा नोकरी , व्यवसायातील देखील प्रगतीचा कालवाधी असतो त्यामुळे त्यांचे जादातर लक्ष आपल्या नोकरी, व्यवसायात असल्याने मुलांना वेळ देणे शक्य होत नाही. मात्र आपल्या कामाबरोबरच आपल्या कुटुंबाला , मुलांना देखील योग्य वेळ देणे आवश्यक आहे. मुलांना वेळ देणे म्हणजे केवळ शरीराने त्यांच्यासोबत असणे नव्हे तर मानसिकदृष्ट्या ही पालकांनी त्यांचासोबत असणे होय. अनेक पालक भरमसाट पैसा खर्च करून मुलांना विविध प्रकारच्या गमती जमती पुरवतात मात्र पैशाच्या मदतीने मुलांना क्वालिटी लाईफ देणे शक्य नाही हे पालकांनी लक्षात घ्यायला हवे. मुलांना काय हवे असते तर प्रेम , स्वातंत्र्य, सन्मान , स्वत:चे कौतुक आणि यासाठी पालकांनी दिलेला खास वेळ, क्वालिटी टाईम .
क्वालिटी टाईम म्हणजे मुलांच्या सहवासात राहून त्यांना असे अनुभव देणे ज्याद्वारे त्यांना आनंदप्राप्ती होईल व ते अनुभव ,प्रसंग त्यांच्या दिर्घकाळ स्मरणात राहून त्यांच्या भविष्याच्या वाटचालीमध्ये त्यांना उपयोगी ठरतील. त्यामुळे याठिकाणी तुम्ही त्यांना किती वेळ देतात यापेक्षा कसा वेळ देता हे महत्वाचे आहे. कारण समजून चला एखादा पालक त्याच्या मुलांना दिवसातील दोन ते तीन तास वेळ देतात मात्र या कालावधी मध्ये ते मुलांना त्यांच्या मनाप्रमाणे वागू न देता फक्त आणि फक्त आपल्याला ज्या हव्या आहेत त्याच कृती करून घेतात अशावेळी त्यांचा सहवास मुलांना हवासा वाटेल का ? तर निश्चितच नाही. कारण ते या वेळेत एकप्रकारे मुलांच्या डोक्यावर बसलेले असतात. तर दुसरे पालक आहेत जे दिवसातील फक्त अर्धाच तास मुलांना देतात मात्र या वेळेत मुलांचे विचार , मते व आपले विचार या दोन्हीमध्ये एकवाक्यता आणून मुलांना आनंदी अनुभव देतात. त्यामुळे अशा पालकांचा सहवास मुलांना आपोआपच हवासा वाटेतो. म्हणून या वेळाची आखणी अत्यंत कल्पकतेने करणे आवश्यक आहे . मुलांबरोबर तुम्हाला काय करायला आवडेल अशा गोष्टींची आधी यादी करा. मुलांनाही अशी यादी करू दे. त्यानंतर ही यादी दोघे मिळून पक्की करा.
मुलांना क्वालिटी टाईम देत असताना त्यांचासोबत आपण अनेक गोष्टी करू शकतो उदा. मुलांसोबत खेळणे त्यांच्याशी गप्पागोष्टी करणे , त्यांना विविध अनुभव, प्रसंग सांगणे त्यांना बाहेर फिरायला घेवून जाणे अशा अनेक कृती आपल्या खास वेळेत करता येतील मात्र या गोष्टी करत असताना पालकांनी मुलांशी पूर्णपणे एकरूप होवून जाणे महत्वाचे आहे. कारण क्वालिटी टाईम म्हणजे पालकांनी मुलांना व मुलांनी पालकांना मनापासून एखादी गोष्ट शिकवणे होय.
मुलांना जर क्वालिटी लाईफ द्यायची असेल तर सर्वप्रथम त्यांना क्वालिटी टाईम म्हणजेच खासवेळ देणे आवश्यक आहे. चला तर मग आपल्या मुलांना जास्तीत जास्त क्वालिटी टाईम देता येईल याचे नियोजन करुया व मुलांच्या प्रगतीला गती देऊया . पालकत्व आनंददायी बनवण्यासाठी उपयुकत असणा-या 21 तत्वापैकी दुसरे तत्व आज आपण पाहिले ते म्हणजे मुलांशी संवाद साधण्यासाठी खास वेळ काढणे...!

No comments:
Post a Comment